"...मतदानाच्या वेळी कुठे जाता?"; राज ठाकरेंची मतदारांना विचारणा, म्हणाले "जे पिळवणूक करतात त्यांच्याच हाती..."

MNS Raj Thackeray: लोक प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात, मात्र मतदानावेळी कुठे जातात अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांनी आपातकालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नसल्याचं सांगत प्रशासनावर हल्लाबोल केला.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2023, 01:31 PM IST
"...मतदानाच्या वेळी कुठे जाता?"; राज ठाकरेंची मतदारांना विचारणा, म्हणाले "जे पिळवणूक करतात त्यांच्याच हाती..." title=

MNS Raj Thackeray: लोक प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात, मात्र मतदानावेळी कुठे जातात अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत मनसेचा साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी आपातकालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नसल्याचं सांगत प्रशासनावर हल्लाबोल केला. 

"मी 2006 मध्ये महाराष्ट्राचा विकास आराखडा आणेन असं सांगितलं होतं तो याच योजनेचा भाग होता. राजकीय पक्षांनी समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांना हात घातला पाहिजे. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान कोणत्या स्थितीत काम करत असतात ते पाहता त्यांचं कौतुक होत नाही. त्यांनाही त्यांचं कुटुंब असतं, बायका-पोरं असतात. आग लागल्यानंतर माझा नवरा त्यात अडकेल का? तो परत येईल का? अशी चिंता रोज त्यांना सतावत असते. जाणिवा जिवंत असतील तर यांचं सर्वाधिक कौतुक झालं पाहिजे. पोलिसांनाही पुढे काय मांडून ठेवलं असेल याची माहिती नसते," असं सांगत राज ठाकरेंनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

"सगळ्या प्रंसगात आपण धावून जातो. सगळे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात. पण मतदानाच्या वेळी कुठे जातात असा प्रश्न पडतो," अशी खंत राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. "काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शेतकरी माझ्याकडे आले होते. अनेक प्रश्न सांगत होते. त्यांना मी आमदार, खासदार कोणत्या पक्षाचा, जिल्हा परिषद कोणाच्या हातात आहे अशी विचारणा केली. मी त्यांना म्हटलं अरे जे पिळवणूक करतात त्यांच्याच हातीत सत्ता देणार असाल तर माझ्याकडे येता कशाला? त्यावर त्यांनी आता तुमचा विचार करु म्हटलं. मी म्हटलं पाहू काय होतं ते. त्यातल्या एका पोराने मला चाबूक दिला. मी म्हटलं नाही मतदान केलं ना....", अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरेंनी केली.

"जगभरात आपातकालीन घटना घडतात तेव्हा त्यांच्याकडे किती चांगली यंत्रणा असते. काही दिवसांपूर्वी मी शारजाचा फोटो पाहिला. पावसाने मैदान भिजलं असता इतर यंत्रणा होत्याच, पण हेलिकॉप्टरनेही सुकवलं.  आणि आपल्याकडे अहमदाबादमध्ये हेअर ड्रायरने सुकवत होते. ही आपल्याकडची आपातकालीन यंत्रणा आहे," अशी टीका राज ठाकरेंनी केली. पक्षात अशा शाखा उभ्या केल्या याचा मला अभिमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 

"मी यावेळी तयार राहा असं सांगितलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतील. सरकारसह आपणही सतर्क राहिलं पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान राज ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचा विषय मांडला. "एखाद्या भागात बाहेरच्या लोकांनी किती यावं आणि असणारी यंत्रणा किती बिघडावी. नाले कोणामुळे तुंबत आहेत? राज्याच्या बाहेरुन लोक येणार, त्या नाल्याच्या चारही बाजूंनी झोपडपट्या उभ्या करणार, त्यातच सांडपाणी टाकणार. मला वाटायचं मला मुंबईत तीन नद्या आहेत. एकच उरली आहे मिठी नदी, तिलाही अशा मिठ्या मारल्यात की त्यातून ती बाहेरच येत नाही. पण मी पाणीतज्ज्ञ चितळे यांना भेटलो तेव्हा त्यांनी पाच नद्या होत्या असं सांगितलं. त्यातील चार आपण मारुन टाकल्या. पाचवी आता मरायला आली आहे," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला. 

"मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आहे त्याचा बाजूला लागून कित्येक हजार झोपड्या आहेत. याचं कारण प्रशासन, आमदार, खासदार यांचं लक्ष नाही. आमची मतं वाढवा, जमिनीचे भाव वाढवा, पैसे कमवू द्या, मतदान करा आणि मरा असंच सुरु आहे. काही गोष्टी या नैसर्गिक नसतात. पण काही गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या असतात," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या पाहिजेत असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. 

बिहारमधील पूल पडलेल्या घटनेचा उल्लेख करताना राज ठाकरेंनी एका पत्रकाराने वर्षभरापूर्वी इशारा दिला होता हे सांगत टीका केली. सरकारने त्या पत्रकाराला अटक केल्याचं सांगत त्यांनी आपला मुद्दा मांडला.