Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने शनिवारी 16 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासोबत संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तसेच महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकांचा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी राज ठाकरेंचा भाषणादरम्यानचा एक पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. निवडणूक जाहीर झाली, संधी आली! जनतेने राजकारण वठणीवर आणावं! असा संदेश या फोटोवर लिहिण्यात आला आहे.
त्यासोबतच या ट्वीटला दिलेल्या कॅप्शनमध्येही त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे. "लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !", असे आवाहन मनसेने सर्व मतदारांना केले आहे. त्यासोबतच #लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण असे हॅशटॅगही या ट्वीटसोबत शेअर केले आहेत. मनसेने केलेले हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !#लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण pic.twitter.com/M3W9eA8FaJ
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 16, 2024
दरम्यान महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.
पहिला टप्पा – मतदान तारीख – 19 एप्रिल
महाराष्ट्र - रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर
दुसरा टप्पा – मतदान तारीख – 26 एप्रिल
महाराष्ट्र - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – मतदान तारीख – 7 मे
महाराष्ट्र - रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – मतदान तारीख – 13 मे
महाराष्ट्र - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – मतदान तारीख – 20 मे
महाराष्ट्र - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतल्या 6 जागा