औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा हाती घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे १३ फेब्रुवारीला औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नामांतराविषयीची भूमिका स्पष्ट करण्य़ाची शक्यता आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेची आहे. पण शिवसेना आता नामांतराच्या मुद्यावर काहीही करणार नाही असा मनसेचा आरोप आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात राज महापालिका निवडणुकीसाठीचा आढावा घेणारच आहेत. शिवाय औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरही भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी मनसे नामांतराचा मुद्दा उचलू शकते. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मनसेमध्ये जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मनसे कामाला लागली आहे.
औरंगाबाद महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे सत्तेत असलेल्या शिवसेनेला आतापर्यंत भाजपचं आव्हान होतं पण आता त्यांना मनसेचं ही आव्हान असणार आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे २९, भाजपचे २२ तर एमआयएमचे २५ नगरसेवक आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे चालले आहेत. यासाठी मनसेने झेंडा आणि दिशा ही बदलली आहे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जात सरकार स्थापन केल्याने हिंदुत्वाच्या मुद्दयावर मनसेला पुढे येण्याची संधी आहे. अनेक शिवसेना नेते यामुळे नाराज आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक नेते मनसेत जाण्याची शक्यता वाढली आहे.