योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मनसेने नवीन मनविसे अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची होत आहे.
यावर बोलताना 'मनसेचे विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष पद स्विकारण्याबाबत अद्याप काही ठरलं नसून राजसाहेब ठाकरे जी जबाबदारी देतील ती पार पाडायला तयार असल्याचं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकच्या दौर्यामध्ये अमित ठाकरे सहभागी झाले आहेत. या युवा नेतृत्वच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात महाविकास आघाडीत कोणीच खुश नाही, ना विद्यार्थी ना डॉक्टर ना सामान्य नागरिक कोणीच खुश नाही. त्यामुळे राज साहेब यांना सत्तेत कसं आणायचं याचा विचार युवकांनी केला पाहिजे, सरकारमध्ये चांगलं काम सुरू नाही, त्यामुळे आता तरी लोकांनी विचार केला पाहिजे असं आवाहन अमित ठाकरे यांनी तरुणांना केलं
मनसे विद्यार्थी सेनेची धुरा अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात यावी अशी मनसे कार्यकर्त्यांकडून होत असली तरी मनसे विद्यार्थी सेनेची धुरा मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसे विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अखिल चित्रे आणि मनसे विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे या तिघांपैकी एकाच्या हातात सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. मनसे कडून तात्काळ विद्यार्थी सेना अध्यक्ष नियुक्ती करून डॅमेज कंट्रोल केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे आणि अमित ठाकरे पिता-पुत्रांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर वेळात वेळ काढून संध्याकाळी अमित ठाकरे यांनी फुटबॉलचा आनंद घेतला. शहरातील नाशिक युनायटेड स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंसोबत खेळताना अमित ठाकरे यांनी एक गोलही केला. अमित ठाकरे आता पुढील चार दिवस नाशिकमध्ये मुक्काम करत राजकीय आढावा घेणार आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांची मतं जाणून अहवाल तयार कारणार आहेत.