मुरबाड : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. कल्याण–नगर महामार्गावरील रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली. मुसळधार पावासामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहात आहे. नदीच्या जलप्रवाहामुळे टिटवाळा मुरबाड रस्त्यावरील रायते पुल खचला आणि अनेकांच्या डोळ्यासमोर संसार उद्धवस्त झाले.
गेल्या ४८ तासांपेक्षा अधिक काळापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गावातील २५ ते ३० घरांत २६ तारखेला रात्रीच्या अंधारात पाणी शिरले. जीव मुठीत घेऊन गावकरी एकमेकांना मदत करायला सरसावले. परंतु जेव्हा उल्हासनदीचे पाणी ओसरले तेव्हा अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले होते. काही क्षणातच सर्व होत्याच नव्हतं झाले.
रायते गावातील उल्हास नदीच्या जलप्रवाहामुळे साधारण २३ जनावरे, गोठ्यात बांधलेल्या गाई-वासरे जागीच पावसाच्या पाण्यात अडकली आणि गोठ्यातच मुत्युमुखी पडली
गावात विजपुरवठा बंद आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, खायला अन्न नाही. हक्काचं घर उध्वस्त होऊन गेले. या परिस्थितीत ४८ तासांपर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभाग पोहोचले नाही. आसपासच्या अनेक गावातील संपर्क तुटला आहे.