राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, दुसऱ्या घटनेत 32 वर्षीय महिलेच्या डोक्यात वार

आंबेगाव तालुक्यात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.  

Updated: May 27, 2021, 02:01 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, दुसऱ्या घटनेत 32 वर्षीय महिलेच्या डोक्यात वार
संग्रहित छाया

आंबेगाव पुणे :  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सचिन जाधव यांची पोंदेवाडी काठापूर रस्त्यावर रात्री हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत  32 वर्षीय महिलेच्या डोक्यात वार करुन जबर जखमी केले. यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेनंतर आंबेगाव तालुक्यात भीतीचे  वातावरण पसरले आहे.

सचिन जाधव यांची पोंदेवाडी काठापूर रस्त्यावर रात्री हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींनी सचिन जाधव यांचा मृतदेह आणि गाडी अहमदनगर जिल्ह्यातील कोरठण घाटात जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी अवघ्या काही तासात हत्येचा छडा लावत बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाली असून या हत्येच्या कटात एकूण चार आरोपींचा सहभाग आहे, अशी माहिती पोलिसांंनी दिली. दरम्यान, यातील दोघे फरार असून पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान,  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात या दोन्ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरी हत्या थोरांदळे गावात घडली आहे. द्रौपदाबाई गिरे या ३२ वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार करत अन्द्यात व्यक्तीने हत्या केली असून गिरे या मोलमजुरी करत असून पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी च्या कामासाठी त्या अहमदनगर जिल्ह्यातून आंबेगाव तालुक्यात आल्या होत्या,या हत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नसून या बाबत अधिक तपास आता मंचर पोलिस करत आहेत.