महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा

Mysterious Underground Sounds In Raigad: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कसबे शिवथर या गावातून गूढ आवाज येत असल्याचे समोर आले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 6, 2023, 12:13 PM IST
महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा title=
Mysterious Underground Sounds In Maharashtras raigad mahad Village

Raigad News Today: महाडच्या कसबे शिवथर गावात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची माहिती समोर आली आहे. भूगर्भातून आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या आवाजांचे गूढ शोधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, एनडीआरएफ टीमने गावाला भेट दिली आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला असून सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आला आहे. तसंच, भूगर्भ तज्ञांची टीम सोमवारी गावाला भेट देणार आहे. (Raigad

महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठ मोठे आवाज येत होते.  त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या गावात ७० ते ८० घरं आहेत. ४ ऑगस्ट रोजी दिवसभर अधून मधून आवाज येत होते. तर, त्याच रात्री मोठा जमिनीतून मोठा  आवाज झाला. भूगर्भातून आलेल्या आवाजामुळं नागरिक घाबरले होते. त्यांनंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. 

महाडचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीम सह गावाला भेट दिली. प्रशासनाच्या पथकाने दिवसभर पाहणी केली. मात्र त्यांना यामागची कारणे अद्याप समजू शकली नाहीत. या टीमने ग्रामस्थांना धीर देत सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान आता सोमवारी भूगर्भ तज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात येणार आहे. ही टीम गावाला भेट देऊन या आवाजामागच्या कारणांचा शोध घेईल अशी अपेक्षा आहे. मात्र ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

 

जमिनीतून धूर निघू लागला

दरम्यान, या आधी महाराष्ट्रातील लातूरच्या भूगर्भातून गूढ आवाज ऐकू आला होता. तर काही वर्षांपूर्वी हिंगोलीतूनही असेच गूढ आवाज ऐकू आले होते. भूकंपाची शक्यता नसतानाही असे आवाज येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

जुलै महिन्यात हिंगोली तालुक्यातील माळरानावरील जमिनीतून अचानक धूर निघाले होते. तर, दगडदेखील भाजून काळे पडले होते. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारातील माळरानावर हा प्रकार घडला होता. जमिनीतून अचानक धूर निघत असून तेथील जमीनही गरम होत आहे. लक्ष्मण नाईक तांडा येथील एका लोखंडी खांबाजवळ जमिनीतून अचानक धूर निघतोय. तसेच तेथील जमीनही गरम झाली आहे.