जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात पोलिसांनी पकडलेल्या कोट्यवधींच्या हवाला रकमेच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे... पोलिसांच्या काही खबऱ्यांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांच्या हवाला रकमेच्या या प्रकरणात कमी जप्ती दाखवून तब्बल अडीच कोटी रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याचे आता समोर आले आहे...यामुळे चार खबऱ्यांच्या अटके नंतर पोलिसांच्या एकूणच कारवाई वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एम एच ३१ एफ ए ४६११ क्रमांकाच्या डस्टर गाडीमधून 29 एप्रिलच्या पहाटे अडिच वाजता नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या एका पथकाने हवालाच्या माध्यमातून नागपूरला आणलेली कोट्यवधीची रक्कम जप्त केली होती. प्रजापती चौकात ही गाडी अडविल्यानंतर ती थेट पोलीस स्टेशनला न आणता गाडी तब्बल ४५ मिनिटं अज्ञात स्थळी नेण्यात आली होती. त्यानंतर या कारवाईत ३ कोटी १८ लाखांची रक्कम जप्त करण्यात आल्याच सांगण्यात आल.
मात्र ज्या व्यापा-याची रक्कम त्या गाडीत होती त्या खंडेलवाल नावाच्या व्यापा-यानं ५ कोटी ७३ लाख रूपये गाडीत असल्याच वरिष्ठ पोलीस अधिका-यांना सांगितल होत. त्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसांनी कमी रकमेची जप्ती दाखवून काही गैरव्यवहार केला आहे का असा संशय बळावला होता.धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यापासून या संपूर्ण कारवाईत खबरे म्हणून सचिन पडगिलवार आणि रवी माचेवार हे दोघे बेपत्ता झाले होते... आता सातारा पोलिसांनी दोघांना इतर दोघांसह महाबळेश्वर च्या एका हॉटेल मधून अटक केली आहे...सचिन पडगिलवार,रवी माचेवार,पिंटू वासनिक व गजानन मुनमुने असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चौघांना नागपुरात आणले गेले आहे... त्यांची सध्या चौकशी सुरु असून या हवाला रक्कम परस्पर लंपास करण्याच्या या प्रकरणात कोणते पोलीस अधिकारी सहभागी होते याचा खुलासा होणार आहे... दरम्यान याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर याप्रकरणी बोलण्यास नकार दिला.
सातारा पोलिसांनी या प्रकरणात महाबळेश्वर मधून चार खबऱ्यांना पकडून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केलेयं. याच चौघांनी हवाला रकमेच्या प्रकरणात सुमारे अडीच कोटींच्या रकमेवर हात साफ केल्याचे समोर आलयं...या चौघांकडून केवळ दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, आता उर्वरित पैशाचा तपास पोलीस करीत आहेत... दरम्यान, या कामी त्यांना नागपूर पोलिसांच्या काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का याची चौकशीही आता नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.