नागपूर : महाराष्ट्रामध्येही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. नागपुरामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे, त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर पोहोचली आहे. नागपूरमध्ये एका रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण अमेरिकेतून नुकताच भारतात परतला आहे.
नागपूर आधी पुण्यात कोरोनाचे ८ आणि मुंबईत २ रुग्ण आढळले आहेत. परदेशातून आलेल्या ग्रुपच्या माध्यमातून कोरोनाचा प्रचार झाला आहे, पण या सगळ्या रुग्णांना झालेली बाधा सौम्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
कोरोनाचा धोका रोखण्यासाठी भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिलीय. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसांना वगळण्यात आलंय.
जे परदेशातून आले असतील त्यांनी गर्दीपासून लांब राहावं, तसंच घरात वेगळं राहावं. गर्दीचे आणि सणावाराचे कार्यक्रम टाळा. सगळ्यांनी मास्क लावून फिरण्याची गरज नाही, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. शाळा आणि कॉलेज बंद करण्याबाबत आज तरी निर्णय घेतलेला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शनिवारी किंवा रविवारी अधिवेशनाचं कामकाज पूर्ण करु, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
कोरोनाचे रुग्ण राज्यात आढळले असले तरी लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. लोकांनी खबरदारी मात्र घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्रात सापडलेले कोरोनाचे रुग्णांची प्रकृती गंभीर किंवा अतिगंभीर नाही, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
जगात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर अडीच टक्के इतका आहे. त्यातही महाराष्ट्रात सापडलेल्या रुग्णांची स्थिती स्थिर आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असा दिलासाही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.