नांदेड : येत्या 11 ऑक्टोबरला होणा-या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत सोमवारी संध्याकाळी संपली. नांदे़ड महापालिकेत 81 जागा असून, ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि इतर पक्ष अशी बहुरंगी लढत होणाराय.
2012 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगरसेवक निवडून आले होते. पण आता काँग्रेसच्या ताब्यातून नांदेड वाघाळा महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपनं कंबर कसलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला उद्धवस्त करण्यासाठी शिवसेनेनंही प्रयत्न चालवलेयत. 11 ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर दुस-याच दिवशी 12 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणाराय.
दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी चांगलीच रणधुमाळी रंगली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा सोमवारी नांदेडमध्ये झाल्या. एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना, या नेत्यांनी परस्परांवर वार, प्रतिवार आणि प्रहार केले.