सिंधुदुर्ग : कणकवलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. यावेली माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. आज राणेंचा परिवार म्हणजे त्यांचा पक्ष एक कुटूंब हे भाजपमध्ये आले आहे. त्यांचे स्वागत आहे. आता आक्रमक राणेंना भाजपमध्ये थोडा सयम बाळगावा लागले, असे सांगत राणेंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्वागत केले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री ज्या कणकवलीत ही सभा घेणार आहेत, त्याच मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपचे उमेदवार आहेत तर शिवसेनेनेदेखील आपला उमेदवार या मतदारसंघातून उभा केला आहे. कणकवलीमधून सतिश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. सतिश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उद्या कणकवलीत सभा घेणार आहोत. त्यामुळे या सभेकडेही लक्ष लागले आहे.
आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कोणतीही टीका केली नाही. नितेश राणे आक्रमकपणे विरोधी बाकावरुन कोकणचे प्रश्न मांडत होते. आता हे प्रश्न अधिक प्रमाणात सोडविण्यात मदत होईल. कारण आक्रमक राणे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्यासोबत मी काम केले आहे. ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळीही काम करण्याची संधी मिळाली आहे. आता पुन्हा राणेंचे कुटूंब भाजपमध्ये आल्याने काम करण्याची संधी पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे यापुढे कोकणचा विकास चांगला होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.