सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : तरुणाईमध्ये सध्या सोशल मिडीयाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रिल्स (Reels) बनवून लाईक आणि कमेंटसाठी काहीही करण्याची तयारी तरुणांमध्ये असते. यातून तीव्र स्पर्धा सुरु झाली असून गुन्हेगारीगारीचं (Criminality) प्रमाणही वाढलं आहे. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मिडीयावर तरूणांच्या झालेल्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून यात सहा विधीसंघर्ष बालकांसह तीन तरुणाचा समावेश आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिकच्या सिडको (CIDCO) परिसरात राहणाऱ्या तरुणांनी सोशल मिडीयावर लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमध्ये संग्राम शिरसाट या तरुणाने एक आक्षेपार्ह विधान केल. याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी संग्राम शिरसाट याला मारहाण केली. पण दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तिसऱ्याच तरुणाचा यात जीव गेला.
मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचीच हत्या
घटनेच्या दिवशी संग्राम शिरसाट हा आपले मित्र परशुराम नजान, रोहित पाटील आणि अभिषेक बच्छाव यांच्याबरोबर जेवायला सावता नगर इथल्या एका हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी संशयित आरोपींनी हॉटेलमध्ये जाऊन संग्राम शिरसाट याला जाब विचारला. हा वाद वाढत गेला आणि भांडणाला सुरुवात झाली. पण त्याचवेळी संग्राम शिरसाटचा मित्र परशुराम नजाम याने मध्यस्थी करत संग्रामला हॉटेलच्या बाहेर नेलं. त्यानंतर परशुराम हॉटेलच्याबाहेर उभा असताना संशयीत आरोपीने अचानक येऊन त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. यात परशुराम गंभीर जखमी झाला.
परशुरामवर हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या परशुरामला मित्रांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सहा विधीसंघर्ष बालकांचा समावेश
मंगळवारी रात्री उशिरा परशुराम याच्या खून प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि 24 तासाच्या आत संशयित आरोपींना अटक केली. यात सहा विधीसंघर्ष बालकांचा समावेश आहे.
शिवीगाळ केल्याने हत्या
दरम्यान, पुण्यातील कोंढवा परिसरात एक ज्येष्ठ नागरिकाची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली. हकीमद्दिन बारोट असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 66 वर्षांचे होते. याप्रकरणी 32 वर्षांच्या महेश ओव्हाळ या तरुणाला अटक केली आहे. हकीमद्दिनने महेशला शिवीगाळ केली होती, याचा राग मनात धरून महेशन त्यांची हत्या केली. रविवारी रात्री मद्यपान केल्यानंतर मयत व्यक्तीने आरोपीला शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपीने डोक्यात फरशी मारून खून केला