योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : समाधी देणं हे संत परंपरेत पवित्र कार्य मानलं जातं. मात्र त्यात अनेक कायदेशीर प्रक्रियांचं उल्लंघन केलं जातंय. शासन आणि साधू महंत यांच्यात याबाबत संवादच होत नसल्याचं वास्तव समोर आलंय. याबाबत ही प्रक्रिया पूर्ण देशभर अनिर्बंधपणे होत असल्याचं समोर आलंय. देशभरात वेगवेगळ्या साधू महंतांचे आखाडे आहेत. त्यात त्यांच्या अनेक संत, शिष्य, भक्तांचे परिवार आहेत. आखाड्यांच्या पदासाठी आणि उत्तराधिकारी नेमण्यासाठी होणारे वाद आणि मारामाऱ्या या सर्वश्रुत आहेत. मात्र या आखाड्यात होणाऱ्या मृत्यूंबाबत कुठल्याही संतांची शिष्यांची तपासणी न होता समाधी दिली जाते हे धक्कादायक वास्तव झी २४ तासने त्र्यंबकेश्वरातील जनार्दन स्वामी मठातील समाधी प्रकरणात उघड झालंय.
याबाबत कायदेशीर नियम, अटी याबाबत कुठलीही माहिती साधू महंतांना नसल्याचं समोर आलंय. आखाडा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या भक्त परीवारातल्या संतांनी याबाबत अनभिज्ञता व्यक्त केलीय. त्र्यंबकेश्वरातल्या समाधींबाबत अजूनही स्पष्टपणे खुलासा झालेला नाही. शांतिगिरी महाराजांचे प्रवक्ते मात्र सगळं काही कायदेशीर असल्याचं सांगतायत. तर पोलीस मात्र कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं मान्य करत आहेत. त्यामुळे आता यंत्रणेत समन्वय नसल्याचं स्पष्ट झालंय.
या सर्व प्रकरणात एकूणच सावळा गोंधळ असून कुणालाही काहीही माहिती नसल्याने आपापल्या पद्धतींने या धार्मिक परंपरा अव्याहतपणे सुरू आहेत. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन समाधीबाबत स्पष्ट निर्देश तयार करण्याची गरज आहे. नाहीतर अशा श्रद्धा आणि संतपरंपरेच्या आडून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.