नवी मुंबई : बँक दरोडा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सातजणांना अटक केली. आंतरराज्य टोळीनं हा दरोडा घातल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झालीय. आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.
दरम्यान, मुंबई बँक दरोडा प्रकरणात मुंबई पोलीस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून तीन सराफ व्यवसायिकांची चौकशी सुरु केली. मालेगावात एकाला अटक झल्यानन्तर नाशिक मध्ये मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु आहे.
जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरची ही भक्ती रेसीडेन्सी इमारत. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बँक ऑफ बरोडामध्ये गेल्या १३ नोव्हेंबरला दरोडा पडला. बँकेतले ३० लॉकर फोडून त्यातले सव्वा तीन कोटी रूपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लुटण्यात आला. बँकेच्या शेजारची तीन दुकाने सोडून असलेल्या बालाजी फरसाण मार्ट या दुकानातून जवळपास ४० फूट लांबीचं भुयार खोदून, सुट्टीच्या दिवशी हा दरोडा घालण्यात आला. या दरोडेखोरांचा माग काढण्याचं मोठं आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढं होतं. त्यासाठी दहा पथकं तयार करण्यात आली.
या दरोड्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती. गेल्या जून महिन्यात बँकेच्या शेजारचं दुकान आरोपी शोधत होते. पण ते उपलब्ध झालं नाही. अखेर तीन दुकानं सोडून असलेलं दुकानं त्यांनी भाड्यानं घेतलं. गेना बच्चन प्रसादनं २५ हजार रूपये भाडं देऊन त्याठिकाणी बालाजी जनरल स्टोअर नावानं फरसाण मार्ट सुरू केलं. जेमतेम ५०० ते ७०० रूपयांचा धंदा तिथं व्हायचा. भुयाराचं अंतर जास्त असल्यानं खोदकामासाठी बाहेरून कामगार मागवण्यात आले.
बिल्डींग बांधण्याचे साहित्य वापरून भुयार बांधण्यात आलं. शनिवार, रविवारची सुट्टी साधत हा दरोडा घालण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पळून जाण्यासाठी दरोडेखोरांनी इर्टिगा गाडी वापरली होती. या गाडीचा शोध घेताना, पोलिसांनी बैंगनवाडी इथून श्रवण हेगडे, मोमीन अमीन खान, हाजीद अली सफदर अली बेग आणि अनमान महंते अली या चौघांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून, मालेगावच्या रमेश वाघ नावाच्या सोनाराला पोलिसांनी पकडलं.
आरोपी मोईउद्दीन शेख यानं रमेश वाघ नावाच्या सोनाराला मुद्देमाल विकला. त्याशिवाय आणखी काही ठिकाणी देखील आरोपींनी मुद्देमाल विकला. त्यापैकी सगळा मुद्देमाल अजून सापडलेला नाही. दीड किलो सोनं जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. आतापर्यंत ७ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, त्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. आता बाकीच्या आरोपींना पकडण्याचं आव्हान पोलिसांपुढं आहे.