Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh: शरद पवारांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) पक्षाकडून मुंब्या-कळव्यातून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड आता प्रचारात व्यग्र आहेत. पण यादरम्यान मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांना एका अनपेक्षित घटनेचा सामना करावा लागला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात एक गंभीर घटना पाहायला मिळाली आहे. पक्षातील दोन नेते आपापसात भिडल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. झालं असं की, पत्रकावर आपला फोटो छापला नसल्याने अल्पसंख्यांक विभागाचे नेते युनूस शेख नाराज होते. ते आपली नाराजी जाहीर करत असतानाच जितेंद्र आव्हाड तिथे पोहोचले. यावेळी जितेंद्र आव्हाड त्यांची समजूत काढत शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण युनूस शेख काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते.
जितेंद्र आव्हाड त्यांचा हात पकडून माझी चूक झाली असं सांगत होते. त्यावर ते तुमची चूक नाही असं सांगत होते. यादरम्यान त्यांनी एक शिवीदेखील दिली. तसंच पत्रकावर ज्यांचे फोटो छापले आहेत ते कोण आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली. यादरम्यान तिथे वातावरण काही वेळ चांगलंच तापलं होतं. इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वाद निवळला. इतर कार्यकर्त्यांनी त्यांना कॅमेऱ्यांपासून दूर नेलं.
#WATCH | Mumbra, Maharashtra: NCP-SCP leader Jitendra Awhad and party's state Minority Vice President Yunus Shaikh got into a scuffle over the party's election manifesto book. (27.10) pic.twitter.com/YDFaORzWFq
— ANI (@ANI) October 28, 2024
जितेंद्र आव्हाडांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याची पत्रकं मतदारसंघात वाटली जात आहेत. या जाहीरनाम्यावरूनच आव्हाड व युनूस शेख यांच्यात वाद झाल्याचं बोललं जात आहे. "माझा राग हा जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत नसून आमचे अध्यक्ष शमीम खान यांच्यावर आहे. त्यांच्यावरील नाराजी कायम राहील. निवडणूक असल्याने सध्या आम्ही काम करु. पण शमीम खान यांच्याविरोधात आता सुरुवात झाली आहे. त्यांची वर्तणूक आम्हा कार्यकर्त्यांना आवडत नाही. त्यांनी अनेक उलट कामं केली आहेत. पण आम्ही साहेबांकडे पाहून आम्ही शांत राहू," असं सांगत युनुस शेख यांनी कार्यकर्ता आणि त्यांच्या व्यथा सांगितल्या.