31st साठी मुंबईच्या रस्त्यांवर 15000 पोलीस तैनात! महिलांची छेड काढणाऱ्यांना...

31st December In Mumbai: संपूर्ण देशाबरोबरच देशाची आर्थिक राजधानाही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली असतानाच पोलिसांनीही विशेष नियोजन केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 31, 2024, 07:11 AM IST
31st साठी मुंबईच्या रस्त्यांवर 15000 पोलीस तैनात! महिलांची छेड काढणाऱ्यांना... title=
मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त (फाइल फोटो)

31st December In Mumbai: नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही नवीन वर्षाचं जंगी स्वागत होणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झालेत. मात्र नव्या वर्षाचं स्वागत करताना कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासंदर्भातील काळजी घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवर 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. 30 तारखेच्या रात्रीपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी थर्डी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि तपासणी सुरू झाली आहे.

कुठे आणि कोण पुरवणार सुरक्षा?

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईमधील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेत सुरक्षेसाठी मुंबईमध्ये तब्बल 15 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याबरोबरच
सशस्त्र दल, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके आणि फोर्सवन आदी विशेष पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे. मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांपैकी असलेल्या गेट वे ऑफ इंडियासह गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, आक्सा, मढ, मार्वे, गोराई या चौपाट्या आणि पवई तलाव आदी ठिकाणी पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयातील सुसज्ज मुख्य नियंत्रण कक्षातून शहरातील बारीक- सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. 

सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष

थर्टी फर्स्टसाठी मुंबईकर चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनेकडूनही या काळात विशेष सागरी सुरक्षा कवच पुरवण्यात येणार आहे.

छेडछाड करणाऱ्यांवर आणि ड्रग्ज तस्करीविरोधात कठोर कारवाई

थर्टीफर्स्टच्या रात्री महिलांच्या छेडछाडीबाबतच्या प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या तरुणाईसाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच या शक्यतेतून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने कंबर कसली आहे. मुंबई पोलिसांच्या या विशेष पथकांनी शहरातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. हॉटेल्स, पब्ज, नाइट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवरील पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय करण्यात आलं आहे.

फौजफाट्याची आकडेवारी...

पोलिसांबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या प्लाटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम, आरसीपी प्लाटून, होमगार्ड्स तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिस दलाकडून वाहतूक विभागासह 8 अपर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपआयुक्त, 53 सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह 2184 पोलिस अधिकारी आणि 12048 पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात.