मुकुल कुलकर्णी, झी मीडिया : आधारकार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांना यापुढे रेशन दुकानाचा आधार मिळणार नाही, अन्न आणि पुरवठा विभागाने आधारकार्डला शिधापत्रिकाशी लिंक करण्याचा निर्णय घेतला असून 1 जुलैपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे,
राज्य आणि केंद्र सरकारने आधारकार्डचा वापर आता सक्तीचा केलाय, त्याचा एक भाग म्हणून रेशन धान्य दुकानाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आधारकार्ड अत्यावश्यक करण्यात आलाय.
एक जुलैपासून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक केलं जाणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्या लाभार्थ्यांना यापुढे रेशनचे कुठलेच धान्य मिळणार नाही, एका कुटुंबातील चार व्यक्ती पैकी तीन व्यक्तीकडे आधारकार्ड असेल तर त्या तिघांच्याच वाट्याचे धान्य इथून पुढे दिले जाणार आहे. जिल्ह्यात आजमितीस 37 लाख 64 हजार लाभार्थी आहे ज्यांना रेशनचे धान्य दिले जाते
रेशनधान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी या बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे, राज्यातील जवळपास 51 हजार स्वस्त धान्य दुकानात पॉईंट ऑफ सेल हे मशीन बसविले जाणार.
प्रत्येक ग्राहकाला त्या मशीनचा उपयोग करावा लागणार असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी आता नागरिकांची धावपळ होणार आहे सरकारने आधारकार्डची सक्ती करण्याआधी जनजागृती करणे गरजेचे होते अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतेय.
अशा नव्या योजनेची घोषणा करणं खूपच लोकप्रिय सवय आहे. पण यांची अमंलबजावणी करताना होणारा गोंधळ निदान यावेळी दिसू नये हिच अपेक्षा