प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर : सध्या राज्यात पोट निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुका जिंकण्यासाठी दाखवली जाणारी वेगवेगळी आमीषं, कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या मनसोक्त पार्ट्या, सत्तेसाठी होणारा घोडेबाजार... अमाप पैशांची उधळण... वाद-विवाद... निवडणुकींचं हे नित्याचच समीकरण झालंय. पण नगर जिल्ह्यातलं एक गाव या सगळ्याला अपवाद ठरलंय. या गावात गेल्या २५ वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही.
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं बोरबण गाव मुळा नदीच्या काठी वसलेलं आणि चारही बाजूंनी डोंगराने वेढलेलं आहे. १९९३ मध्ये या गावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून गावातले लोक अगदी गुण्यागोविंदानं राहतात. गेल्या २५ वर्षांत या ग्रामपंचायतीची निवडणूक झालीच नाही. गावात कुठलंही विकास काम करायचं असेल तर सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, चर्चा करुनच निर्णय घेतला जातो. बोरबण गावामध्ये ग्रामपंचायत, दूध संस्था, पतसंस्था, विविध सहकारी सोसायटी अशा संस्था आहेत. पण यापैकी एकाही संस्थेत गेल्या पंचवीस वर्षांत निवडणूक झालेली नाही. निवडणूक जवळ आली की गावातले जाणकार एकत्र बसून या वेळी कोणाला संधी द्यायची त्याचा निर्णय घेतात. नुकतीच या गावाची ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणुका बिनविरोध होत असल्यानं त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा विकासकामांसाठी सत्कारणी लागतो. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे बोरबण हे गाव राज्यातलं पहिलं हागणदारीमुक्त गाव ठरलंय. निर्मलग्राम, पिण्याच्या पाण्याची योजना, सिमेंटचे रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, खेळाचे सुसज्ज मैदान अशी विकासकामं गावाने केली आहेत. विशेष म्हणजे या गावात कोणताही राजकीय पक्ष आणि संघटनाही नाही. कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा फलकही या गावात दिसत नाही.
या गावाला दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कारही मिळालाय. गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल आणि दप्तरमुक्त आहे. असंही एक गाव असू शकतं, यावर विश्वास ठेवणं कठीण. पण बोरबण गावानं हे करुन दाखवलंय.