आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : कार अथवा बस बंद पडल्याने प्रवाशांचा पायपीट झाल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र, भर जंगलात रेल्वे बंद पडल्याने(railway shutdown) प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरुन पायपीट करावी लागली आहे. UP, बिहार नाही तर महाराष्ट्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चंद्रपूरमध्ये(Chandrapur) ही रेल्वे नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना तब्बल चार किलोमीटर पायपीट करावी लागली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रेल्वेच्या महत्त्वाच्या चांदाफोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहोचणारी गोंदिया -बल्लारपूर पॅसेंजर रेल्वे चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर ऐन जंगलात नादुरुस्त झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गोंदिया व धानपट्ट्यातून शेकडो प्रवासी चंद्रपुरात दाखल होण्यासाठी या रेल्वेने प्रवास करत होते.
चंद्रपूर शहरापासून चार किलोमीटर आधी भर जंगलात रेल्वे इंजिन मध्ये बिघाड आल्याने रेल्वे मध्येच थांबली. प्रवाशांनी अर्धा तासाहून अधिक काळपर्यंत इंजिन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर प्रवाशांनी अवजड बॅग व इतर वस्तूंसह रेल्वेट्रॅक वरूनच चंद्रपूर गाठायला सुरुवात केली. \
हजारो प्रवाशांनी अशाच पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करत चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन गाठले. बल्लारपूर रेल्वे स्टेशनहुन अन्य एक इंजिन बोलावून नादुरुस्त इंजिन मुख्य मार्गावरून बाजूला केल्यानंतर येथील एकेरी मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली.