कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : सत्ता आली तरी आपली झोळी रिकामीच राहिली. या भावनेने पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात उपोषण सुरू केलं आहे. पिंपरी चिंचवडच्या भाजप कार्यकर्त्यांची ही भावना. पक्षाविरोधातच त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कोणताही मोठा नेता नसताना पक्षाचं अस्तित्व टिकवलं. मोदी लाटेचा विचार करून लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे भाजपमध्ये गेले. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही आले. महापालिका तिकीट वाटप, सत्ता आल्यावर महापौर, उपमहापौरपद, स्थायी समिती या बाहेरून आलेल्यांना मिळाली. आता प्रभाग समिती सदस्यपदीही डावललं गेलं. 24 ठिकाणी या बाहेरून आलेल्या आमदारांनी त्यांच्याच माणसांना संधी दिली. अखेर भाजपच्या या जुन्या मूळ कार्यकर्त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं.
मात्र एवढं होऊनही बाहेरून आलेल्या या दोन्ही आमदारांनी या उपोषणाला काडीचीही किंमत दिलेली नाही. तर पक्ष प्रवक्त्यांनी मात्र खूपजण इच्छूक असल्याने काही जणांना संधी मिळू शकते असं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी चिंचवडमध्ये सध्या कोणतंही पद घोषीत झालं की लांडगे गटाचा की जगताप गटाचा असा प्रश्न विचारला जातोय यावरूनच शहर भाजपची स्थिती काय असेल ते लक्षात येईल. आता या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना खरंच काही न्याय मिळणार की दुर्लक्षाच्या स्वार्थी लाटेत ते वाहून जाणार याचं उत्तर त्यांना त्यांनी निष्ठा वाहिलेल्या पक्षानेच द्यायचंय.