अमर काणे, झी मीडिया, नागपूर : अपघाताचा देखावा निर्माण करून मदतीला येणाऱ्या कारचालकाची सुमारे सव्वा लाखाची रक्कम लंपास करण्यात आली. नागपुरात हा प्रकार घडला. पाहूया नेमका काय प्रकार घडला. हा अनुभव आला नागपूरचे व्यावसायिक परविंदरसिंग मान यांना. मंगळवारी सावनेरवरून संध्याकाळी ते घरी परतत होते. ओमनगर परिसरात त्यांच्या कारला एका दुचाकीस्वाराने ओव्हरटेक केलं. कारच्या समोर गेल्यावर तो दुचाकीस्वार दुचाकीसह खाली प़डला. त्याला गंभीर दुखापत झाली असावी असं वाटल्याने मान त्याला मदत करण्यासाठी धावले. मात्र दुचाकीस्वाराचा हा केवळ एक बहाणा होता. पलविंदर यांची पैशांची बॅग त्यांच्या कारमधून लंपास करण्यात आली.
अपघाताचा देखावा तयार करून त्यात पलविंदर यांनी मान अडकवण्यात आली. त्यांच्या गाडीतले तब्बल सव्वालाख रूपये चोरून चोरटे पसार झाले.
हे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असतात. कधी अपघाताचा बहाणा, कधी चाकातली हवी कमी झालीय अशी बतावणी, कधी गाडीतून ठिणग्या उडत असल्याची थाप... विविध कारणांनी गाड्या थांबवून प्रवाशांना लुटलं जातंय. हे प्रकार पोलिसांनी तातडीने थांबवणं गरजेचं आहे. नाही तर रस्त्यात खरोखर अपघात झाला तर कोणीच भविष्यात थांबणार नाही.