ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रो थेट लोकलला जोडणार, आज PM मोदी करणार भूमीपूजन

PM Modi Visit Mumbai: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यासाठी बीकेसी येथील मेट्रो स्थानकात तयारी करण्यात आली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2024, 10:29 AM IST
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रो थेट लोकलला जोडणार, आज PM मोदी करणार भूमीपूजन  title=
PM to visit Maharashtra inaugurate projects worth 32800 crore including thane metro project

PM Modi Visit Mumbai: पंतप्रधान मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान अनेक विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात विविध मेट्रोचे भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. साधारण दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी ठाण्यात 32,800 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प. या प्रकल्पाचा ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे. 

पंतप्रधान मोदी आज 12,200 कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला ठाणे इंटीग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. हा प्रकल्प एकूण 29 किमी लांबीचा असून त्यात 20 एलिवेटेड आणि 2 भूमिगत स्थानके आहेत. हा प्रकल्प ठाण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडीवर या प्रकल्पामुळं थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कसा आहे ठाणे इंटीग्रल रिंग मेट्रो प्रकल्प? जाणून घेऊया. 

ठाणे इंटिग्रल मेट्रो प्रकल्प हा 29 किमी लांबीचा असून यातील 26 किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून 3 किमीचा मार्ग भूमिगत आहे. या प्रकल्पांतर्गंत 22 स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातीलच एक भूमिगत स्थानक थेट ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. तर, अन्य स्थानके मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत. 

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पासाठी 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसंच, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अंदाजे 7.31 लाख प्रवाशांना या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार आहे. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत यासारखे महत्त्वाचे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात?

पंतप्रधान मोदी आज सकाळी 11.30च्या सुमारास वाशिमच्या पोहरादेवी येथील  नंगारा वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. त्यानंतर ठाण्यातील विकास कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नंतर, बीकेसी येथे मेट्रो 3 प्रकल्पाचे लोकार्पण करुन सांताक्रुझ ते मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवासही करणार आहेत. त्याचवेळी ते विद्यार्थी आणि कामगारांसोबत संवादही साधणार आहेत. तसंच, MetroConnect3 नावाचे एक अॅपदेखील लाँच करण्यात येणार आहे.  त्यानंतर ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.