कृष्णात पाटील-अमोल पेडणेकर, झी २४ तास, मुंबई : 'पंजाब ऍन्ड महाराष्ट्र कॉपरेटीव्ह बँके'त (पीएमसी) पैसे अडकल्यानं खातेदारांमध्ये चितेचं वातावरण आहे. बँकेत अडकलेल्या पैशांच्या विवंचनेत मुंबईत अवघ्या चोवीत तासात दोन खातेदारांचा मृत्यू झालाय. अंधेरीचे रहिवासी संजय गुलाटी आणि मुलुंडचे रहिवासी फतमल पंजाबी या दोन पीएमसी खातेदारांचा तणावातून मृत्यू झालाय. बँक अजून किती खातेदारांचा बळी घेणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
पीएमसी बँक खातेदारांच्या जीवावर उठलीय की काय? अशी स्थिती आहे. बँकेत पैसे अडकलेले खातेदार मानसिकदृष्ट्या खचल्याची धक्कादायक गोष्ट समोर आलीय. अवघ्या २४ तासांत बँकेच्या दोन खातेदारांचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू झालाय.
अंधेरीत राहणाऱ्या संजय गुलाटी यांचे पीएमसी बँकेत ९० लाख रूपये अडकले होते. सोमवारी बँकेतील आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी आयोजित आंदोलनात गुलाटी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर ते घरी गेले आणि जेवताना त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यात त्यांचं निधन झालं. संजय गुलाटींची जेट एअरवेजमधील नोकरी सुटल्यानंतर त्यातून मिळालेले ९० लाख रुपये त्यांनी पीएमसी बँकेत ठेवले होते. या व्याजातून कुटुंबाची गुजराण सुरु होती. शिवाय त्यांच्या अपंग मुलाचे उपचारही सुरु होते. पण बँक बंद पडल्यानं सगळंच ठप्प झालं.
मुलुंडमध्ये राहणारे फतमल पंजाबी यांचेही पैसे पीएमसी बँकेत अडकले होते. पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं? या विवंचनेत होतं. या चिंतेत असतानाच त्यांचा हार्ट अॅटॅक आला. त्यातत त्यांचा मृत्यू झाला. २४ तासांत दोन खातेदारांच्या मृत्यूमुळे पीएमसी खातेधारकांमधला रोष वाढलाय. बँकेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जातेय.
बँकेमुळे खातेदारांची आर्थिक नाकांबंदी झालीय. अनेक खातेदार नैराश्येच्या गर्तेत गेलेत. पीएमसी बँक किती गोरगरीब खातेदारांचा बळी घेणार? असा सवाल आता विचारला जातोय.