गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणीमध्ये (Prabhani News) पाच जणांच्या दुर्दैवी मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. सेप्टिक टँकची (safety tank) स्वच्छता करण्यासाठी त्यात उतरलेल्या पाच कामगारांची गुदमरुन मृत्यू झाला आहे. एका फार्महाऊसमध्ये असलेल्या सेप्टिक टॅंकच्या सफाईदरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबांतील सदस्यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
गुरुवारी रात्री परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. भाऊचा तांडा येथील विठ्ठल मारोती राठोड यांच्या फार्म हाऊसवर गुरुवारी दुपारपासून काही जण सेप्टिक टॅंक स्वच्छ करत होते. त्यानंतर अचानक रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान टॅंकमध्ये काही लोक बेशुद्ध पडल्याचे एकाच्या लक्षात आले. त्या व्यक्तीने तात्काळ याची माहिती परभणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांना बाहेर काढले.
पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने सेप्टीक टॅंक फोडून सहा जणांना त्यातून बाहेर काढले. मात्र त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये परळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पाच जणांचे मृतदेह परभणी शासकीय रुगणालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये बाप लेक, जावई, आणि एका चुलत भावाचा समावेश आहे. हे सर्व जण सोनपेठ शहरातील रहिवाशी आहेत.
शेख सादेक (45) , शेख शाहरुख (20), शेख जुनेद (29) शेख नविद (25), शेख फिरोज (19) अशी मृतांची नावे आहेत. शेख साबेर (18) हा याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परळी येथे उपचार सुरु आहेत. मृतांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या शिवारातील मारोती दगडू राठोड यांच्या आकाड्यावर सेप्टीक टॅंक स्वछ करण्याचे कंत्राट सोनपेठमधल्या काही कामगारांनी घेतले होते. गुरुवारी शेख सादेक, शेख जुनेद, शेख शाहरूख, शेख नवीद, शेख फेरोज, शेख साबेर हे सहा जण सेफ्टीक टॅंक स्वच्छ करण्यासाठी उतरले होते. त्यानंतर संध्याकाळी सर्वच कामगार बेशुद्ध पडल्याचे वर असलेल्या व्यक्तीने पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली.