प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)मागील अनेक वर्षांपासून करत होते. त्यांची ही मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली आहे. दिव्यांगांसाठी एक वेगळे मंत्रालय नेमण्याची घोषणा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रालय परिसरात लाडू वाटप करत आपला आनंद व्यक्त केला आहे(Maharashtra Politics).
दिव्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी तसेच योग्य रितीने न्याय मिळावा यासाठी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून करत होते. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी अनेक आंदोलनं देखील केली.
अखेर शिंदे फडणवीस सरकारने त्यांच्यामागणीची गांभीर्यांने दखल घेत दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्यामागणीला मान्यता दिली आहे. मागणी मान्य झाल्यांनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्यामुळे दिव्यांगांचे अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लागतील असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. दिव्यांग मंत्रालय हे एक वेगळं मंत्रालय स्थापन होणार आहे. यामुळे या मंत्रालयाला मंत्री , सचिव आणि अधिकारी मिळतील.
बच्चू कडू यांचा देखील लवकरच मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास त्याचा आनंद वेगळाच असणार आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.