बीड : बीडच्या खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. प्रीतम मुंडे यांनी निवडणुकीसाठीच्या नामनिर्देशनपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत, त्यांचं सदस्यत्व रद्द करायची मागणी कालिदास आपेट यांनी केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना प्रीतम यांनी त्यांचं मूळ गाव नाथरा असल्याचं सांगत, तिथल्या मतदार यादीतला क्रमांक दिला. तर मुंबईतल्या वरळी मतदारसंघातल्या मतदार यादीत त्यांचं नाव प्रीतम गौरव खाडे असं आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीची दोन नावं कशी असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. तसंच वैद्यनाथ बॅंकेच्या संचालक असलेल्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
मात्र ते गुन्हेही त्यांनी नामनिर्देशनपत्रात दाखवलेले नाहीत. शिवाय संपत्तीचं विवरणही त्यांनी चुकीचं दिल्याचा आरोप आपेट यांनी केला आहे.