पुणे : कोर्ट (Court) सुरु असताना महिला वकिलांनी केस नीट करु नयेत अशी नोटीस पुणे जिल्हा कोर्टानं काढली आहे. पुणे न्यायालयानं (Pune Court) 20 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली होती. यामध्ये महिला वकिलांना कोर्टात सुनावणी दरम्यान केस सावरु नये किंवा नीट करु नये असं सांगण्यात आलं आहे. महिलांनी असं केल्यास न्यायालयाच्या कार्यवाहीत लक्ष विचलित होतं आणि न्यायालयाच्या सुनावणीत अडथळा येतो, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. त्यामुळे महिला वकिलांनी कोर्टाची कार्यवाही सुरु असताना असं काही करु नये. यासोबतच नोटीसवर पुणे जिला न्यायालयाच्या रजिस्ट्रार (Registrar) यांची स्वाक्षरीही आहे. या नोटीशीचा एक फोटो ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी शेअर केला होता. यात त्यांनी म्हटलं आहे, वाह... महिला वकिलांमुळे कोणाचं लक्ष विचलित होत आहे आणि का?
Wow now look ! Who is distracted by women advocates and why ! pic.twitter.com/XTT4iIcCbx
— Indira Jaising (@IJaising) October 23, 2022
नोटीसमध्ये नेमकं काय लिहिलंय?
जारी केलेल्या नोटीसमध्ये महिला वकिल कोर्टात अनेकवेळा आपले केस बांधत असल्याचं किंवा वेणी घालत असल्याचं निदर्शनास आलं आहे. महिलांनी असं केल्यास न्यायालयाच्या कार्यवाहीत लक्ष विचलित होतं आणि न्यायालयाच्या सुनावणीत अडथळा येतो, त्यामुळे महिला वकिलांनी यापुढे असं करणं टाळावं अशी सूचना या नोटीशीत करण्यात आली आहे.
दरम्यान, फॅमिली कोर्टाच्या अध्यक्षा वैशाली चांदणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोर्टाचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे महिला वकिलांच्या कुठल्याही अधिकारावरती गदा येणार नाही असं वैशाली चांदणे यांनी म्हटलं आहे.