अहमदनगर : काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करणार अशी अहमदनगरमध्ये चर्चा रंगते आहे. १२ एप्रिल रोजी नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या तीन-चार दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचं विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला आहे. विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनताई विखे पाटील मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपाचे नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करत आहे.
झी 24 तासच्या प्रतिनिधीने याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता विखे पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसून पूर्वीही अशा चर्चा होत राहिल्या असल्याचे सांगितले. मात्र राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही निवडणूक सभांना विखे गैरहजर होते. तसंच - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची काँग्रेसची एकही सभा विखे पाटील यांनी अद्याप घेतलेली नाही. त्यांच्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे मात्र ते एकदाही औरंगाबादकडे फिरकले नाहीत. त्यामुळे विखे काँग्रेसवर नाराज असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.