Rain In Maharashtra : पुण्यात आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain In Pune) दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्याला यंदा परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. काल हडपसर भागात पडलेल्या पावसाने रस्त्याला नदीचं रुप आलं. उद्याही पुण्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरातही जोरदार पाऊस बरसला. रस्त्यावर पाणी आल्यानं खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. पुणे शहरात रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. होळकरवाडीमध्ये तुफान पाऊस बरसला. हडपसर, उंडरी या भागात पुन्हा रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे पुण्यातील हडपसर परिसर जलमय झाला. रस्त्याला नदीचे रुप प्राप्त झालं होतं. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येत होते.
पुण्यात उरुळीकांचन भवरापूर या गावांदरम्यान एक तरुण पुलावरुन वाहून गेला. प्रशांत चांगदेव डोंबाळे असं या तरुणाचं नाव आहे. हा तरूण ओढ्यावरील कच्च्या पुलावरुन रात्री चालला होता. पण अंधारात पुराचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. सकाळी त्याची दुचाकी ओढ्यात सापडलीय. तरुणाचा शोध सुरु आहे.
पुरंदर परिसरात झालेल्या पावसामुळे कऱ्हा नदीला पूर आलाय. नदीकाठच्या घरात कऱ्हा नदीच्या पुराचं घुसलं. बारामती शहरातील काही भागात हे पाणी शिरलंय. याच कऱ्हा नदीच्या पुराची खंडोबानगर परिसरातली ही ड्रोन दृश्ये आहेत. कऱ्हा नदी काठोकाठ वाहतेय. काही ठिकाणी पाणी नदीपात्राबाहेर आलंय.
उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कोबीचं पिक शेतातच सडलंय. शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी परिसरात काढणीला आलेलं कोबीचं पिक शेतातच कुजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात भाजीपाला पिकांची पावसामुळे अशीच अवस्था आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याभरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने थैमान घातलंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी आहे. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सततच्या पावसाने याआधीच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय.
संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द परिसरात जोरदार पावसानं चांगलचं थैमान घातलं. या पावसानं अनेक शेतांना तळ्याचं स्वरुप आलं. गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील पूलावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होतं.त्यामुळे शालेय विद्यार्थी नागरिक आणि जनावरांचे मोठे हाल झाले.
पंढरपूरात भीमा नदीची पाणी पातळी वाढलीय. सखल भागात पाणी शिरलंय. तसंच वाळवंटातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय. पुणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपल्यानं उजनी धरणात पाण्याची अवाक वाढलीय. उजनी धरणातून 60 हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं होतं. वीर धरणातूनही नीरा नदीचा विसर्ग वाढवला होता. त्यामुळं भीमा नदी पात्रात 98 हजार क्युसेक पाणी आहे. यामुळं भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.
परतीच्या पावसाने नांदेड जिल्ह्यात थैमान घातलंय. अतिवृष्टीमुळे तब्बल 5 लाख 23 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालाय. शेतात कापून ठेवलेले सोयाबीनही भिजून खराब झालेत. जिल्ह्यासाठी जवळपास सातशे कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. पण दिवाळी तोंडावर आलेली असतानाही अनुदान जमा झाली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले. सिल्लोड, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.धरणातून 22 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे नदीला पूर आलाय. नदीकाठच्या 48 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.