अमरावती : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) जोरदार तडाखा दिला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र पुढील 48 तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तर विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. विदर्भात नागपूर, वर्धा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. अमरावतीत (Amravati) वीज अंगावर पडून अविनाश गोल्हर या 29 वर्षीय शेतकरी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ( Farmer Death in Amravati)
हवामान खात्यानं वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून 18 मार्चला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, मेळघाट परिसरात तुफान गारपीट झाल्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा वादळी पाऊस व गारपीट झाली. यात मुसळधार पावसामुळे काढायला आलेला गहू व काढलेला हरभरा पावसात भिजला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 9 तालुक्याला या वादळी पावसाचा तडाखा बसला. तर पथ्रोड येथे गोठ्यात काम करत असतांना वीज अंगावर पडून अविनाश गोल्हर या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतात बांधून ठेवलेल्या बैल जोडीवर विज पडून बैलजोडीचा मृत्यू झाला. तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, अंजनगाव सूर्जी सह 9 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. आमला विशेश्वर येथील शेतकऱ्यांच्या गहू पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर उन्हाळ्यात घेतला जाणाऱ्या कांदा पिकासह संत्र्याचं देखील नुकसान झालं आहे. पुढे आणखी काही दिवस आणखी विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.
परभणीच्या सोनपेठ तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, हळद, हरभरा, ज्वारी, भाजीपाला या पिकांचं नुकसान झाल्याची शक्यताय. हवामान विभागानं राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार परभणी जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून गारवा निर्माण झालाय. परभणी जिल्ह्यातील पालम, पूर्णा, गंगाखेड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वा-यासह गारपीट झाली. निळा वंदन आणि उखळी गाव परिसरात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे उघड्यावर असलेली कापून ठेवलेली पिकं झाकून टाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली.