मुंबई : Rajya Sabha Elections :महाविकास आघाडीची (Maha vikas Aghadi) डोकेदुखी कमी व्हायला तयार नाही. निधी वाटपावरुन रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल अजूनही नाराज आहेत. मंत्र्यांनी विसरु नये की ते आमच्यामुळेच मंत्री आहेत, असा इशारा त्यांनी दिला. निधी देताना अपेक्षा ठेवल्या जातात, असा खळबळजनक आरोप जयस्वाल यांनी केलाय. 20 तारखेनंतर अशा मंत्र्यांची पोलखोल करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आहेत. मुख्यमंत्री ठाकरे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र, त्याआधी महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदार आणि मंत्र्यांची नाराजी उघड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मतदानाआधी सर्व आमदारांशी स्वतः संवाद साधणार आहेत. आमदार फुटू नयेत यासाठी सर्व आमदारांना 10 तारखेपर्यंत एकत्र ठेवलं जाणार आहे. निधी वाटपावरुन रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल अजूनही नाराज आहेत. त्यांनी आपली उघड नाराजी मीडियासमोर व्यक्त केली आहे. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही निर्वाणीचा इशारा दिला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. राज्यात धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावी अशी कडूची मागणी आहे. पण ही जर मागणी दुर्लक्षित केली तर राज्यसभेचे मतदान हे शेवटच्या पाच मिनिटात करु, असा इशारा सुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीआधीच नाराजी उघड झाल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.