मुंबई : मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार नितेश राणे आणि नारायण राणे आज दुपारी 1.45 वाजता मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाले. नारायण राणे यांचे जबाब ५ तासांहून अधिक काळ नोंदवण्यात आले, अशी माहिती राणे यांचे वकील ऍड. सतीश मानेशिंदे यांनी दिली.
नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली माहिती ते योग्य वेळी सीबीआयला देतील, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. तर, राणे यांच्याकडून कोणताही गुन्हा घडला नाही तरी पोलीस त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ऍड. सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, नारायण राणे आणि नितेश राणे यांनी तपास पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रश्न केले. त्यावर तपास अधिकाऱ्यांनी राणे पितापुत्र यांची उलट तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राणे यांनी पत्रकार परिषदेत जे आरोप केले ते कोणत्या पुराव्यांच्या आधारे केले? दिशाचा पोस्टमार्टेम अहवाल आला नाही हा दावा तुम्ही कोणत्या आधारावर करत आहात? कोणत्या मंत्र्याची गाडी घटनास्थळी होती याचा पुरावा काय असे सवाल त्यांना करण्यात आले.
दिशावर बलात्कार केल्याचा आरोप तुम्ही करताय. तिच्यावर कुणी बलात्कार केला ? त्याचा पुरावा काय? तुम्ही जबाबदार मंत्री आहात, आमदार आहात. मग हे आरोप करण्याआधी तुम्ही तपास यंत्रणांना संपर्क का केला नाही ? पुरावे असतील तर ते का सादर केले नाही ? पुरावे नसताना आरोप करताय तर एका महिलेचं मृत्यूनंतर, चरित्रहनन का केलं ? असे सवालही राणे पितापुत्रांना तपास अधिकाऱ्याने केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.