वीष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : हिरवा, पिवळा, राखाडी अशा विविध रंगाचे अनेक बेडूक आपण पाहिले असतील. पण पांढरा बेडूक कधी पाहिलाय का. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याील आडस इथं दुर्मिळ पांढरा बेडूक आढळला आहे. उमेश आकुसकर यांच्या शेतात हा पांढऱ्या रंगाचा बेडूक आढळला असून त्यांनी त्या दुर्मिळ बेडकाचे फोटो काढत सोशल मीडियावर टाकले.
उमेश आकुसकर हे दुपारी स्वतः च्या होळ रोडवर असलेल्या शेतात गेले होते. त्यांची लिंबुनीची बाग असून बागेत झाडावरून गळून पडलेले लिंबू वेचायला सुरवात केली. यावेळी त्यांना पांढऱ्या रंगाची एक वस्तू दिसली. उत्सुकता म्हणून त्यांनी हात लावताच बेडकाने टुणकन उडी मारली. तेव्हा हा पांढरा बेडूक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
उमेश यांनी त्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर टाकले. यानंतर पांढरा बेडूक आढळल्याची चर्चा सुरू झाली. परिसरातील अनेक वृध्दांनीही आम्ही पांढरं बेडूक पहिल्यांदाच पाहात असल्याचं सांगितलं.
उमेश आकुसकर यांनी विजेच्या खांबावर आणि तारेवरही काही बेडूक बसल्याचं निदर्शनास आलं असल्याचं सांगितलं.