रत्नागिरी : आपल्या जीवाचं काही बरं - वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी राज्य सरकारनं सुरक्षा करण्याच्या निर्णयावर दिली. यापूर्वी देखील आपली सुरक्षा कमी कमी करण्यात आली. मात्र आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याकडे केंद्राची सुरक्षा असल्याचं राणे यांनी सांगितलं. दरम्यान राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन देखील काढण्यात आलं आहे.
राणे म्हणाले, 'माझी सुरक्षा राज्य सरकारने कालच काढली. मात्र मला केंद्राची सुरक्षा आहे. मी राज्य सरकारच्या सुरक्षेचा विचार करत नाही. मला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती, ती राज्य सरकारने काढली आहे. त्यामुळे माझ्या जीवाचं काही बरं - वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल.' अशी स्पष्ट भूमिका राणे यांनी मांडली आहे.
त्याचप्रमाणे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे.