कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : निरोगी राहण्यासाठी सुट्टी महत्वाची आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनावरील ताण कमी करण्याची खरी गरज आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून सुट्टीवर गेल्यामुळे ह्रदयरोग होण्याची जोखीम ही कमी होऊ शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे सुट्टी ही महत्त्वाचीच आहेत. मुंबई आणि ठाण्यासारखी शहरं झपाट्याने वाढतायत. घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत धावणारी पळणारी माणसं इथं पाहायला मिळतात. नोकरीच्या निमित्ताने लोक धावत असतात. कामासाठी १२ ते १४ तास कामाचं गणित बनलंय. काम आणि वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण होणारा ताण ही चिंतेची बाब बनलीय. त्यावर औषध म्हणजे सुट्टी...
कामामुळे ताण वाढल्यास एक दोन दिवसांची सुट्टी घेणं गरजेचे आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रोज़च्या कामाच्या व्यापातून सुट्टीवर गेल्यामुळे ह्रदयरोगाचा धोका कमी होतो असं हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद साळुंखे सांगतात.
सुट्टीमुळे कामाचा ताण कमी होतो आणि काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते, असं नोकरी करणारे नागरिक सांगतात.
सुट्ट्यामुळे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयरोगाचा धोका कसा टाळता येतो, याबाबत अमेरिकेतील विद्यापीठातील संशोधकांनी सखोल अभ्यास केलाय. धकाधकीच्या जीवनात खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम करणंही गरजेचं असल्याचे डॉक्टर सांगतात.