नागपूर: राज्यातील सर्व जातींना आरक्षण दिले तरी जवळपास ९० टक्के तरुण सरकारी नोकऱ्यांपासून वंचित राहतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. ते शुक्रवारी नागपूरमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, सध्या सर्व जातीच्या व्यक्ती सध्या आरक्षण मागत आहेत. मात्र, या सर्वांना आरक्षण देऊनही त्यातील ९० टक्के तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. सरकारी नोकरीबद्दल तरुणांच्या मनात आकर्षण आहे. मात्र, सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे, ही बाब तरुणांनी समजून घ्यायला हवी, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी तुर्तास आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देणे शक्य नसल्याचेही सांगितले. प्रत्येक जातीत बेघर आणि दारिद्य्ररेषेखालील लोक आहेत. मात्र, अनुसूचित जाती-जमातींमध्ये हे प्रमाण तुलनेने जास्त आहे. अशावेळी समाजाचा विकास करताना तुलनात्मक विचार करावा लागतो. त्यावेळी तुलनेने खाली आहेत त्यांना प्राधान्य द्यावेच लागते. त्यामुळे तुर्तास आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार करता येणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.