Rohit Pawar advised Raj Thackeray : अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बारामतीत भावनिक वातारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादांचा परिवार हा सबंध बारामतीकर आहे. आज श्रीनिवास पवार बोलत आहेत ते यापूर्वी काही का बोलले नाही? असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) अमोल मिटकरींची लायकी काढली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
अमोल मिटकरी यांनी असा आरोप केलाय की, श्रीनिवास पाटील यांना पुत्र प्रेमाचा मोह झालाय. यावर रोहित पवार यांनी उत्तर देत अमोल मिटकरी यांची लायकी काढली. ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका सामान्य जनतेची आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे योग्य नसल्याचे सर्वांना वाटते. त्यामुळे साहेबांच्या विचाराने चालणारे पवार कुटुंब आहे म्हणून आम्ही पवार साहेब सोबत आहोत. अजितदादांनी स्वतः निर्णय घेत स्वतःला पवार कुटुंबापासून वेगळे केले आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीला येत्या लोकसभा निवडणूक 30 पेक्षा अधिक जागा मिळतील. कमीत कमी 30 जास्तीत जास्त 40 असा जागा महविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना देखील सल्ला दिलाय. 2019 ला राज ठाकरेंनी जी भाषणे केली होती ती शेतकऱ्यांच्या बाजूने युवकांच्या बाजूने होती. बेरोजगारीचा प्रश्न हा 2019 चा जेवढा अडचणीचा होता, त्यापेक्षा 2024 मध्ये हा प्रश्न अडचणीचा झालाय. त्यावेळी ते भाजपच्या विरोधात आणि युवा पिढीच्या बाजूने बोलले होते त्यामुळे युवकांनी बाजूने भूमिका घेत राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात लढावं. मराठी अस्मिता जपण्याचा काम हे राज ठाकरेंनी केला आहे त्यामुळे स्वाभिमानी माणूस हा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही हा विश्वास माझ्यासारख्याला आहे, असंही रोहित पवार म्हणतात.
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांची चर्चा करून महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यास हा सर्वसामान्य जनतेला पटू शकतो असं मला वाटतं. दिल्लीला जाणे हेच मुळात आम्हाला पटत नाही, लोकांच्या मनात त्यांच्याविषयी वेगळी भावना तयार होते. लोक खुश नाहीत, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त यांना देखील भूमिका आवडेली नाही, असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिलाय.