Ahmednagar LokSabha Constituency : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अहमदनगर (Ahmednagar Loksabha) येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं खुलं आव्हान भाजप उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके (Nilesh Lanke vs Sujay Vikhe) यांना दिलं आहे. यावर निलेश लंके यांनी आपण कुठल्या भाषेत बोलतो यापेक्षा आपण सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न किती प्रभावीपणे मानतो याला महत्त्व आहे. घटनेनुसार सर्वांना आपल्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे. संसदेमध्ये वेगवेगळ्या राज्यातील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भाषेत बोलतात, आपण किती प्रभावीपणे आपले मुद्दे मांडतो आणि ते कसे पूर्ण करून घेतो याला महत्त्व आहे, असं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात वाद सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सुजय विखे यांना जोरदार टोला लगावला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजतं की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अहमदनगरचं राजकीय गणित
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला अहमदनगर गेल्या 15 वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे. यंदा भाजपनं पुन्हा एकदा सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिलीय. तर आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं लोकसभेच्या रणांगणात उतरणार आहेत. लंकेंचा तगडा जनसंपर्क पाहता विखे विरुद्ध लंके अशी जोरदार काँटे की टक्कर इथं रंगणार आहे. सगेसोयरे आणि सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण, हे नगरच्या राजकारणातलं प्रमुख वैशिष्ट्यं... इथं विखे विरुद्ध थोरात असा उभा राजकीय संघर्ष आहे. या संघर्षात थोरातांचे नातेवाईक असलेले राजळे, त्यांचे नातेवाईक असलेले गडाख, कर्डिलेंचे जावई असलेले संग्राम जगताप आणि संदीप कोतकर नेमकी काय भूमिका घेतात?, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता नगरमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळू शकते.
दरम्यान, पुण्यात देखील रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीवरून वाद पेटला होता. रवींद्र धंगेकर हे अशिक्षित उमेदवार असल्याची टीका सोशल मीडियावर आणि पुण्यातील फ्लेक्सवर होत होती. अशातच धंगेकरांनी देखील त्याला रोखठोक उत्तर दिलंय. आपली जनतेशी नाळ कायम असून जनतेने पीएचडी दिली असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. शिक्षण काढण्याची वेळ विरोधकांवर आली म्हणजे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्याचे धंगेकर यांनी म्हटलं होतं.