Yograj Singh on Yuvraj Singh Caner: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबरोबर झालेल्या एका गंभीर चर्चेसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 2011 साली भारताला 28 वर्षानंतर एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या युवराज सिंगच्या प्रकृतीबद्दल बाप-लेकात त्यावेळी झालेल्या चर्चेबद्दल योगीराज सिंग पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत.
"आपल्या देशासाठी खेळताना युवराज सिंग कॅन्सरने मेला असता आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला असता तरी मी फार अभिमानी बाप म्हणून वावरलो असतो. मला आजही त्याचा फार फार अभिमान वाटतो," असं योगीराज सिंग यांनी म्हटलं आहे. "मी फोनवरुन त्याला या भावना त्यावेळी बोलूनही दाखवल्या होत्या," असंही योगीराज सिंग यांनी सांगितलं. 'अनफिल्टर्ड बाय समधीश' या शोमध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीत योगीराज यांनी हा खुलासा केला आहे.
"त्याला रक्ताच्या उलट्या होत असतानाही त्याने खेळत रहावं असं मला वाटत होता. मी त्याला म्हणालो होतो की, 'काळजी करु नकोस, तू मरणार नाहीस. भारताला हा वर्ल्ड कप जिंकून दे," असं योगीराज सिंग यांनी सांगितलं.
आपल्याकडे क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासाठी जे पालक मुलांना घेऊन येतात त्यांनाही आपण असाच काहीसा इशारा देत असल्याचं योगीराज यांनी सांगितलं. "माझ्याकडे प्रशिक्षणासाठी मुलं घेऊ येणाऱ्या पालकांना मी सांगतो की, तुम्ही मला लिहून द्या की तुमच्या मुलाचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला तर ती गोष्ट माझ्या हातात नसणार," असं योगीराज म्हणाले. योगीराज यांनी भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते सध्या तरुणांना प्रशिक्षण देतात.
नक्की वाचा >> 'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'
दोन वेळा भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराजने आपली पूर्ण क्षमता क्रिकेट करिअदरम्यान वापरलेली नाही, असं आपल्याला वाटत असल्याचंगी योगीराज म्हणाले. "युवराज सिंगने त्याचे वडील करतात त्याच्या 10 टक्के मेहनत केली असती तरी तो फार सर्वोत्तकृष्ट क्रिकेटर झाला असता," असं योगीराज म्हणाले. वयाच्या 66 व्या वर्षी ही योगीराज सिंग यांनी पुढील आयुष्यात आपल्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली तर आपण सगळे विक्रम मोडून काढू असा विश्वास व्यक्त केला.
"मला अजून एक आयुष्य हवं आहे. मला क्रिकेट खेळायचं आहे. मला विव्हीएन रिचर्स्डसनसारखं व्हायचं आहे. मला वेगवान गोलंदाजांपैकी मिचेल होल्डींगसारखं व्हायचं आहे. भारतीय क्रिकेटपटूंपैकी मला केवळ कपील देव आवडतो. अगदी लहानपणापासून आजपर्यंत मी त्याला फार मानत आलो आहे," असं योगीराज सिंग म्हणाले.