अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हेराफेरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल २६ खातेदारांच्या अकाऊंटमधून ११ लाख ५९ हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आलं आहे.
शेती, शेतमजुरी आणि व्यवसाय करुन या गावातल्या नागरिकांनी या बँकेच्या शाखेत पैसे जमा केले होते. मात्र आपल्या अकाऊंटमधील पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांना अकाऊंटमध्ये पैसेच नसल्याचे आढळलं. परस्पर विड्रॉअलद्वारे या पैशांवर डल्ला मारल्याचं समोर येताच खातेदार हादरून गेले. या धक्कादायक प्रकारबद्धल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आली आहे.
दरम्यान, या प्रकाराबद्धल संबंधीत शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, या विषयावर वरिष्ठांशी बोलणे झाले असून, बँकेची अंतर्गत चौकशी सुरु असल्याचं सांगत बँक अधिका-यांनी कॅमे-यासमोर बोलण्यास नकार दिला. तक्राद्रार आणि गावाचे सरपंच यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी अशा तक्रारींमध्ये वाढ होत असून रोकड काढल्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बँक खात्याला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही, असा खोटा दावा करुन शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याची घटना बुलढाण्यातही उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील घारोड गावातील भागवत आत्माराम साबळे हा बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असून यानं शेतक-यांच्या खात्यातील पैश्यांवर डल्ला मारल्याचे समजते.
या धक्कादायक प्रकारानंतर बॅंक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.