RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसशी संबंधित 'विवेक' या साप्ताहिकाने राज्यातील लोकसभेतील पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे महागात पडल्याचे म्हटलं आहे. यापूर्वीही संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी याविषयी सारवासारव केली होती. परंतु पुन्हा संघाशी संबंधित साप्ताहिकाने राष्ट्रवादीला जबाबदार धरल्याने खळबळ उडाली आहे.
'विवेक'मधून अजित पवारांच्या गटावर टीका करताना, "हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, तर हरवलेला आहे, संभ्रमात आहेत," असं म्हटलं आहे. "पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा विचार होण्याची गरज आहे. याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा असा नाही," असंही 'विवेक'मध्ये म्हटलं आहे. "लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून," असं म्हणत 'विवेक'ने संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील खल बोलून दाखवली आहे.
"राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच," असं 'विवेक'ने म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे," असं विश्लेषण 'विवेक'ने केलं आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'
"अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. हे केवळ हिमनगाचे टोक आहे," असं सूचक विधान 'विवेक'च्या लेखामध्ये करण्यात आलं आहे.