Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तो 21 जानेवारी रोजी लिलावती रुग्णालयात पाच दिवस उपचार घेऊन घरी परतला. मात्र सैफवर झालेल्या हल्ल्याबद्दल आता भाजपाचे आमदार आणि राज्यमंत्री मंडळातील मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली आहे. आळंदी येथील जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना नितेश राणेंनी शंका घेतली आहे. दरम्यान नितेश राणेंनी व्यक्त केलेल्या या मतावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नितेश राणेंनी आळंदीमधील जाहीर कार्यक्रमात बोलताना सैफ अली खानवरील हल्ल्याचा उल्लेख करत, "बांगलादेशवाले काय करत आहेत बघा. ते आता मुंबईत काय करतं आहेत पाहिलं ना? सैफ अली खानच्या घरात घुसला बांगलादेशी. पूर्वी बांगलादेशी नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसत आहेत. कदाचित सैफ अली खानला बांगलादेशमध्ये घेऊन जायला घुसला असेल," अशी टीका केली. त्यानंतर पुढे बोलताना, "तो बाहेर येऊन असा चालत होता की मलाच शंका आली की याला खरंच चाकू मारला की अभिनय करत होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर असं टुणूक टुणूक चालत होता. वाटतच नव्हतं की त्याच्यावर चाकू हल्ला झाला आहे," असं नितेश राणे म्हणाले.
नितेश राणेंनी आपल्या भाषणामध्ये सैफवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावरुन दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा मुद्दाही उपस्थित केला. "सैफ अली खानवर हल्ला झाला तर सर्वजण एकत्र येतात मात्र सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करतो त्यावर कुणी काही का बोलत नाही? त्यावेळी बारामतीवाली ताई कुठे असते?" असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> रिक्षाचालकाचं नशीब फळफळलं! सैफने दिलेल्या बक्षिसाच्या दुप्पट पैसे देणार मिका; Insta स्टोरी पाहाच
गुरुवारी सकाळी पत्रकारांनी नितेश राणेंनी केलेल्या विधानावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला. पत्रकारांचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी, "मी आधीच सांगितलं आहे. मी तुमच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री म्हणून बोलतो. तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींने केलेल्या स्टेटमेंटवर मला विचारता. कालच ते माझ्याकडे त्यांच्या खात्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. बाकी मला याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन. एखाद्याच्या मनात वेगळं काही आलं तर ते त्याचं मत आहे. त्यांच्या मनात वेगळं काही असेल तर पोलीस खात्याला सांगावं. मी पण पोलीस खात्याला सांगेन की एखाद्याच्या मनात शंका-कुशंका आहेत," असं उत्तर दिलं.
नक्की पाहा >> 'त्या रात्रीचं भाडं तर देणारच शिवाय...'; जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला बरं झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटल्यानंतर सैफने दिलं वचन
पुढे बोलताना, "वास्तविक ती व्यक्ती सापडली आहे. ती व्यक्ती बांगलादेशमधून आली होती. मुंबईबद्दल आकर्षण सर्वांनाच असतं. आजूबाजूच्या देशातील लोकांनाही असतं. त्याला पुन्हा बांगलादेशला जायचं होतं म्हणून 50 हजारांची गरज होती. पण मागताना त्याने एक कोटी मागितले, हे सगळं पोलीस खात्याने प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. मात्र याव्यतिरिक्त कोणताही इतर क्ल्यू मिळालेला नाही. काल कदाचित सैफ त्यांच्या घरी जाताना त्यांची तब्बेत, त्यांचे कपडे वगैरे पाहून याच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झालं असं वाटलं नसेल. त्यांची तब्बेतच मुळात चांगली आहे. पण झालंय ते झालंय ना?" असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.