अमर काणे, झी २४ तास, नागपूर : वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं... आई लोकांच्या घरी स्वयंपाक करून गुजराण करणारी... अशा परिस्थितीतही नागपूरच्या ऋषिकेश वासे या विद्यार्थ्यानं दहावीत ९३.४० टक्के गुण मिळवले... ऋषिकेश वासे याची ही संघर्षकहाणी...
नागपूरच्या धंतोली भागात लहानशा खोलीत आई आणि बहिणीसोबत राहणारा हा ऋषिकेश वासे... तो लहान असताना वडिलांचं छत्र हरपलं. लोकांच्या घरी स्वयंपाक करून आई कल्पना वासे यांनी मुलांना घडवलं. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळं ऋषिकेशला शिकवणी वर्गाला जाणंही शक्य नव्हतं. तरीही जिद्दीनं आणि चिकाटीनं अभ्यास करत त्यानं दहावीत ९४.४० टक्के गुण मिळवले.
दहावीच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं घेण्याइतकेही पैसे ऋषिकेशकडे नव्हते. त्याच्या शिक्षकांनी अभ्यासासाठीचं साहित्य त्याला घेऊन दिलं. स्वत:चा दहावीचा अभ्यास करताना ऋषिकेशनं वर्गमित्रांनादेखील मार्गदर्शन केल, हे विशेष...
ऋषिकेश सध्या आई-बहिणीसह मामांकडे राहतो. त्याला भविष्यात सनदी अधिकारी व्हायचंय. त्यासाठी गरज आहे ती दानशूर हातांची...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा.
झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३
संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९