Sangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar

Sangli News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी नजरा वळवतात. चर्चेचा विषय ठरतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात. ही बैलगाडा शर्यत त्यापैकीच एक म्हणावी.   

सायली पाटील | Updated: Apr 10, 2023, 10:53 AM IST
Sangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar  title=
Sangli News Bailgada Sharyat Video

Sangli News : राकट देशा... कणखर देशा...! अशी ओळख करून दिली जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जसजसा प्रांत बदलतो तसतसं राहणीमान, भाषेचा लहेजा, खाद्यसंस्कृती इतकंच काय, तर सण- उत्सवांच्या पद्धतीही बदलत जातात. ज्याप्रमाणं भारत देश विविधतेनं नटलेला आहे, त्याचप्रमाणं या महाराष्ट्रातही तितकीच विविधकता पाहायला मिळते. अगदी खेडोपाडी असणारे ग्रामादेवतांचे उत्सव असो किंवा मग पंचक्रोशीतल्या एखाद्या देवाची यात्रा असो. अशा या आपल्या महाराष्ट्रात नुकतीच एक धडाकेबाज बैलगाडा शर्यत पार पडली. (Sangli News Bailgada Sharyat Video)

रुस्तूम-ए-हिंद असं या शर्यतीचं नाव. आता नावातच इतकं वजन असताना या शर्यतीबद्दल पुढं जे काही मांडलं जाईल ते लक्षपूर्वक पाहा. कारण, इथं जो थरार रंगला तो पाहताना तुमच्याही अंगावर काटाच येईल. तुम्ही म्हणाल, नाद करा.... पण यांचा कुठं! 

सांगलीत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार... 

सांगलीतील भाळवणी येथे नुकताच बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि कराडच्या महीब्या या बैलजोडीनं शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. बस्स, मग काय? जेतेपद पटकावणाऱ्या या रुबाबदार बैलजोडीला बक्षीस म्हणून चक्क थार (Thar) गाडी देण्यात आली. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा 

 

महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन यांच्या वतीनं ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 200 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. इथं फक्त थारच नव्हे, तर ट्रॅक्टर आणि बाईक्स अशा एकाहून एक सरस बक्षिसांची लयलूटही स्पर्धेत करण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडा शर्यतप्रेमींनी गर्दी केली होती. जिथं गुलालाची उधळण आणि एकच कल्ला पाहायला मिळाला.