सांगली: शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकासोबत दोन मुख्याध्यापकांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत ही कारवाई केली. शामराव तुकाराम गावित असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. तर, दऱ्याप्पा यशवंत मोरे (तत्कालीन) आणि सुभाष सुखदेव ओमसे (विद्यमान) अशी मुख्याध्यापकांची नावे आहेत. गावित याच्यावर बलात्काराचा संशय आहे. तर, मुख्याध्यापक मोरे आणि ओमसे यांच्यावर गावित याचे कृत्य प्रशासनापासून लपवले व त्याला पाठीशी घातल्याचा आरोप आहे. तिन्ही आरोपींना कवठेमहांकाळ पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.
सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकास निलंबीत केले आहे. तर, जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा मलिन केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकानुसार, पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांचा अहवाल, तसेच, ग्रामस्थांकडून प्राप्त माहिती व गावित याच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा याची दखल घेऊन त्याचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.