तुषार तपासे, झी मीडिया
Satara Crime News: सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाटण तालुक्यातील सनबुरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई- वडिल आणि दोन मुलांचे घरात मृतावस्थेत सापडले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र एकाच घरात चार जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच चर्चा होत आहे. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात हे मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Satara Crime News Today)
आनंदा पांडुरंग जाधव, सुनंदा आनंदराव जाधव, मुलगा संतोष जाधव, मुलगी पुष्पा प्रकाश धस अशी मृतांची नावे आहेत. जाधव कुटुंबियांचे घर गावात आडबाजूला आहे. त्यामुळं घटनेची माहिती उशिरा उघडकीस आली. सकाळ होऊनही घरातून कोणीच बाहेर न आल्याने ग्रामस्थांना संशय आला होता. त्यामुळं त्यांनी आनंदा जाधव यांच्या एखा नातेवाईकाला फोन करुन याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईक तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. व ग्रामस्थांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी घरातील चौघांचे मृतदेह पडलेले दिसले.
ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा जाधव हे काही दिवसांपासून आजारी होते. कराड येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांनंतर त्यांना पुन्हा घरी आणले होते. घरात त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सुविधाही करण्यात आली होती. गुरुवारी सर्वजण एकत्रित होते. गुरुवारी रात्री पुष्पा धस यांच्या मुलाने त्यांना फोन करुन सगळ्यांची चौकशीदेखील केली होती. तसंच, आजोबांच्या तब्येतीची विचारपूसदेखील केली होती. मात्र, अचानक एका रात्रीत काय घडलं हे मात्र गूढ आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
सणबूर गावापासून काही अंतरावर जाधव कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. कुटुंब प्रमुख आनंदा जाधव हे शिक्षक होते. गावापासून काही अंतरावर हे कुटुंब राहत असल्यामुळे हा प्रकार लवकर निदर्शनास आला नाही. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युने सणबूर गाव सुन्न झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरीकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वैद्यकीय पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून प्राथमिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जाधव कुटूंबीय गावापासून दूर राहत असल्यामुळे हा प्रकार नेमका कोणत्या वेळी घडला? याचा देखील तपास सुरू आहे.