तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यात काही दिवसांपूर्वी दोन्ही राजेंमध्ये मोठा वाद पेटला होता. या वादाने मोठं स्वरुप घेतलं होतं. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यात खिंडवाडी येथील बाजार समितीच्या जागेवरून मोठा वाद झाला होता. या वादाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खासदार उदयनराजे यांनी या जागेवर आपला हक्क सांगत तिथे असणारे ऑफिस तोडले होते. यानंतर हे दोन्ही राजे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र आता सर्वाच्च न्यायालयाने (Supreme Court) या जागेचा निकाल आमदार शिवेंद्रराजे म्हणजेच बाजार समितीच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे ही 15 एकर जागा जागा बाजार समितीच्या ताब्यात गेली आहे. सर्वाच्च न्यायालयाने या निकालाने खासदार उदयनराजे यांना दणका दिला आहे.
नेमकं काय झालं होतं?
साताऱ्यातल्या खिंदवाडी भागात काही दिवसांपूर्वी सकाळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक भिडल्याचं पाहायला मिळाले होते. खिंदवाडी गावात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचा भूमिपूजन होणार होतं. मात्र त्याआधीच तिथे पोहचत खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रम उधळून लावला आणि तिथे आणलेलं साहित्य फेकून दिलं. तर कंटेनर उलटा करुन टाकला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतरही शिवेंद्रसिंहराजे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला. त्यानंतर पुन्हा एकदा वाद पेटला. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि वादावर पडदा टाकला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या उभारणीसाठी हा भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या जागेसाठी या जागेवर एक कंटेनर कार्यालय म्हणून उभा करण्यात आला होता. मात्र काही वेळाने उदयनराजेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कंटेनर जेसीबीच्या मदतीने उलटा केला. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले होते.
जागेबाबत का होता दावा?
ही जागा आपल्याच मालकीची असल्याचा दावा उदयनराजे भोसलेंनी केला होता. "ती जागा माझ्या मालकीची आहे. तिथे हे सगळे अल्पभूधारक लोक कोण आहेत? ते जवळपास सात-आठ वर्षं सैन्यामध्ये होते. आज तुम्ही तिथे येऊन दगड ठेवणार, नारळ फोडणार, फटाके फोडणार? या प्रकरणात न्यायालयाचे स्थगिती आदेश आहेत. पण पोलीस त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे यावरचा सविस्तर ड्राफ्ट तयार करू. उद्या उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांच्यासमोर ही मांडणी करणार आहोत," अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी वादानंतर दिली होती.
दरम्यान, जमीन सरकारनेच उपबाजारासाठी अधिग्रहीत करून दिल्याचा दावा शिवेंद्रराजेंनी केला होता. "कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभा करण्यासाठी शासनाकडून ही जमीन अधिग्रहीत करून देण्यात आली आहे. या जमिनीसाठी लागणारी रक्कम बाजार समितीनं भरली आहे. सर्व कायदेशीर गोष्टी केल्या आहेत. जमिनीचा सातबारा कमिटीच्या नावावर आहे," असे शिवेंद्रराजेंनी म्हटलं होतं.