विकास भोसले, प्रतिनिधी, झी मीडिया सातारा : मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करणाऱ्या सातारा जिल्यातील युवराज वसव याचे हात-पाय विजेच्या धक्कयाने जळाले. मात्र वीज कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही. वसव कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
महावितरणच्या वीज वाहिन्या ट्रान्सफॉर्मर हे अनेक ठिकाणी धोकादायक बनलेले असून यामुळे वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वावरहिरे येथे अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. तीन मजली इमारतीवर वेल्डींगचे काम करत असताना ११ हजार केव्हीच्या तारेचा धक्का लागून युवराज वसव या कामगाराचे दोन्ही हात व पाय जळाले आहेत.
त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु असून अद्याप याची दखल कोणत्याही यंत्रणेने घेतलेली नाही. या अपघातातून या कामगाराला जीवदान मिळाले असले तरी हात आणि पाय नसल्याने त्याच्यासमोर उदनिर्वाहाचा निर्माण झाला आहे.
दोन्ही मुले लहान आहेत त्यामुळे वसव यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात झाली आहे मात्र वीज कंपनीने याकडे डोळेझाक केली आहे. गंभीर अपघात होऊनही याची दखल घेण्यात आलेली नाही. अशी व्यथा युवराज वसव याच्या पत्नी उमा वसव यांनी झी मीडिया समोर व्यक्त केली.
युवराजच्या मदतीसाठी अनेक जणांनी मदत करण्यास सुरुवात केली असून कराड तालुक्यातील काले येथील पाच मित्रांनी एकत्र येत, वसव यांचा मुलगा मयुरेश याला दत्तक घेऊन त्यांच्या भविष्यातील सर्व खर्चाची जबाबदारी स्विकारली. विकास पाटील, संतोष गुरव, सौरभ कुलकर्णी, प्रतिक यादव, अविनाश यादव यांनी दाखवलेली संवेदनशीलता या कुटुंबाला दिलासा देणारी ठरली.
जिवंतपणी मरण यातना भोगत असलेल्या युवराज वसव याचे दोन हात व दोन पाय कायमचे निकामी झाले आहेत. मात्र अजुनही विद्युत महामंडळानं कोणतीहि मदत दिली नाही. युवराज यांना न्याय मिळावा व राज्यातील दानशूर व्यक्तींनी मदत करून माणुसकी दाखविण्याची गरज आहे.