नागपूर : देशात असलेली युरियाची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. तो सल्ला ऐकून अनेकांच्या भूवया उंचावरण्याची शक्यता आहे. तर, तो सल्ला असा की, मानवी मूत्राची बॅंक बनवा आणि त्याद्वारे युरिया तयार करा.
मानवी मूत्र बॅंक बनवने ही तशी आव्हानात्मक प्रक्रिया. त्यामुळे ती कशी राबवली जावी याबाबतही गडकरींनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात, गाव आणि तालूका पातळीवर युरिन बॅंक तयार करायला हवी. ज्याच्या माध्यमातून यूरीन एकत्र बनवून युरियाची निर्मीती करता येऊ शकेल. प्रायोगित तत्वावर शेतकरी या युरियाचा वापरही करू पाहू शकतात. मात्र, अशा पद्धतीने युरिया बनविण्यासाठी काही काळ नक्कीच लागेल. पण, एकदाका अशी निर्मीती झाली की, विदेशातून होणाऱ्या युरियाच्या आयातीत घट होईल, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.
गडकरी यांनी म्हटले आहे की, 'मानवी मूत्रात नायट्रोजनचे प्रमाण अधिक असते. या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनामुळे हे नायट्रोजन मोठ्या प्रमाणात वाया जाते. टाकाऊतून टिकावू बनविणे आणि त्याचा मानवी फायद्यासाठी वापर करणे याला माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. मला वाटते की, या संकल्पनेवर काम करण्यात आपले कोणतेही नुकसान होणार नाही. आमच्याकडे पहिल्यापासूनच फॉस्परस आणि पोटॅशियमचे ऑर्गेनिक पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय आम्ही नायट्रोजनसोबत जोडले तर, पिकांना त्याचा चांगला फायदा होईल.'
'जर या उपक्रमावर चांगले काम झाले तर, शेतकरी आणि नागरिक 10 लिटरच्या प्लास्टीकच्या कॅनमध्ये मूत्र एकत्र होईल. तसेच, हे मूत्र एकत्रीतरित्या तालुक्याच्या ठिकाणी जमा करावे. सरकार हे कॅन एकत्र करेन. मूत्र जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर मूत्रामागे एक रूपया सरकार देईल. पुढे हे मूत्र शूद्ध केले जाईल. त्याच्यापासून युरिया तयार करण्यात येईल.'