पुलगाव : पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटक करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला केंद्रीय दारूगोळा भंडार परिसरात कंत्राटदार चांडक याच्या हलगर्जीपणामुळे स्फोटकं हाताळताना शक्तिशाली स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 19 कामगार गंभीर जखमी झाले होते.
हे जोखमीचे व अतिसंवेदनशील काम असते. त्यामुळे तज्ज्ञ चमूच्या निरीक्षणाखाली हे काम केले जाते. परंतु खड्डे खोदणे, दारूगोळा ट्रकमधून खाली उतरवणे, तज्ज्ञ सांगतील त्या ठिकाणी दारूगोळा पोहोचविणे इत्यादी कामांसाठी कामगारांची आऊटसोर्सिंग केली जाते.
अशा कामगारांची आऊटसोर्सिंग आरोपी चांडककडून करण्यात आली होती. हे धोकादायक काम असताना त्यासाठी अकुशल व अप्रशिक्षित कामगार पुरविल्यामुळे चांडकविरुद्ध देवळी पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी सदोष मनुष्यवध व सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे दोन गुन्हे नोंदविले.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी चांडकने सुरुवातीला वर्धा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
तो अर्ज २८ नोव्हेंबर रोजी खारीज झाला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही त्याचा अर्ज खारीज झाल्यानंतर शनिवारी रात्री देवळी येथून पोलिसांनी त्याला अटक केली.